सोमवार, २४ जानेवारी, २०११

पुरावे सोडा

बिचारे दादोजी कोंडदेव. त्यांनी पुरावेच सोडले नाहीत हो? आता तर म्हणे रामदास स्वामी हे गुरु नसून "शिष्य" असल्याचा पुरावा मिळाला आहे त्यांना. म्हणजे पुरावा तसा तोच आहे पण आधी काही लोकांनी जो अर्थ काढला होता त्याच्या एकदम उलट अर्थ निघतोय असे तज्ञांचे मत असल्याचे वाचनात आले आहे. नाहीतर काय? अहो त्याच पुराव्यांवर निर्दोष सुटलेल्यांना जगात वरच्या कोर्टाने त्याच पुराव्यांवरून वेगळा अर्थ काढत शिक्षा दिल्याच्या घटना कदाचित ह्या लोकांनी मनात ठेवल्या असतील. असाच वादंग उठला होता त्या गॅलिलिओच्या काळात. त्याने त्याच पुराव्यांना मानून प्रमेय मात्र मांडले सत्ताधार्‍यांच्या मनाविरूद्धच. म्हणे पृथ्वी विश्वाच्या केंद्रस्थानी नाही. ह्या. असे होणारच नाही. पृथ्वी केंद्र नाही तर मग पृथ्वीवर केंद्रित सत्ता निर्माण करून जनतेवर राज्य ते कसे करायचे एवढा साधा प्रश्न ह्या मूर्ख गॉलिलिओच्या डोक्यात कसा आला नाही ? तरी त्याने नंतर आपली चूक सुधारत युद्धासाठी उपयोगी (तोफेचा अचूक मारा करण्यासाठी उपयुक्त) अशी प्रमेये शोधून काही उतारा मिळविला नाहीतर होतीच त्याची फाशी पक्की. तर सांगायचे काय की जर तुम्हाला या वर्तमानात बरे वाटत नसेल तुम्ही जग बदलण्यासाठी काही व्यक्ति, संस्था, चळवळी घडवत असाल तर मग एकच काम करा. ढिगभर पुरावे तासा तासाला सोडा की अमूक एक शिष्य. अमूक एक गुरु. अमूक एक असाच फुकटचा सोंड्या. नाहीतर काय होइल त्या सोंड्याची १५ वी पिढी असे मानेल की तोच गुरु आणि तुम्ही सोंड्या. मग? चालेल तुम्हाला? काय म्हणालात? फरक काय पडतो? अरे तुम्हाला नसेल फरक पडत (तुम्ही नसणार ना  तेव्हा). पण बिचारी मुले इतिहास म्हणून जे शिकतात त्याने डोक्याचा भूगा होतो त्याचे काय? मोठा भाऊ शिकतो एक आणि पुढल्या वर्षी धाकटा शिकतो उलटेच?  भूगोल मैलावर बदलतो हे समजते पण दैदिप्यमान असा इतिहास देखील आता मैलामैलावर बदलणार का? असे नसेल होऊ द्यायचे तर नम्र विनंति ऐका आणि तुमच्या महान कार्याचे श्रेय मिळण्यापुरते तरी पुरावे सोडाच. काय म्हणता श्रेय नव्हे कार्य महत्वाचे ? खात्रीच पटली आता. कसली काय विचारता?  तुम्ही तुमच्या महान कार्यात यशस्वी होणारच याची. शुभेच्छा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा