शनिवार, २ एप्रिल, २०११

क्रिकेट २०११

भारताने विश्वचषक जिंकून दिवस गाजवला. सर्व टिम मधील खेळाडू, प्रशिक्षक, मॅनेजर्स, फिटनेस राखणारे, साधी कामे करणारे आनंदाने नाचले. स्टेडियमवर तर गणपती बाप्पा मोरयाचा गजर सुरु होता. भारताच्या राष्ट्राध्यक्षा प्रतिभा पाटील, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष राजेपक्षे, खा. राहुल गांधी, आमीर खान, मुकेश अंबानी, रजनीकांत, प्रीटी झींटा (आई गं) ई मान्यवर वेळात वेळ काढून वानखेडेवर खेळ बघताना टिव्हीवर दिसले. महेन्द्रसिंह ढोणीने कॅप्टन म्हणजे काय असतो हे दाखवून दिले. सचिन व वीरेन्द्र २० च्या आत परतल्यावर दडपणाखाली खेळत केवळ एकेक रन घेत त्याने व गंभीरने तीन आकडी लक्ष्याचे दोन आकड्यात रुपांतर कधी केले हे संगकाराला कळले नाही. शेवटी पॉवरप्लेमधे त्याने व युवराजने फोर आणि सिक्स दणकावत टप्पा सोपा केला. आपल्या विकेट्स राखल्या हे त्यांचे श्रेय.  सचिनचा खेळ शेवटच्या मॅच मधे शतक झळकावणारा नसल्याने थोडी निराशा झाली. पण ६ विश्वचषक खेळलेला एकमेव भारतीय खेळाडू विश्वविजयी संघात आहे हे महत्वाचेच. सर्वांचे अभिनंदन. खास गॅरी कर्स्टन आणि  व्यंकटेश प्रसाद या प्रशिक्षकांचे. भारतीय महासत्ता अशीच सर्व क्षेत्रांत विश्वविजयी होत राहो आणि त्यात सर्वांचा वाटा राहो ही सदिच्छा.

मंगळवार, ८ फेब्रुवारी, २०११

दळवी वि.मिस्त्री

एकाने राजकीय भाष्य केलेल्या नथुराम गोडसेचे काल्पनिक आत्मवृत्तपर नाट्य लिहिले, दुसर्‍याने (त्याच्यामते) मुंबईतील वास्तवदर्शी घटनांचा संदर्भ मागे ठेवून काल्पनिक पुस्तक लिहिले. दोघांना लोकांची पसंती मिळालेली विरूद्ध बाजूच्या लोकांना पचली नाही, आंदोलनाने दडपशाहीने म्हणा दोन्ही कलाकृती बंद झाल्या. पण इथे मेख आहे ती म्हणजे मिस्त्रीचे पुस्तक बाजारात उपलब्ध आहेच मात्र दळवींच्या नाटकासाठी नाट्यगृह उपलब्ध होणे अशक्य वाटतेय. फरक जर कुठे दिसला असेल तर तो दोघांना मिळालेल्या समर्थकांच्या "गटाचा". एकाचे समर्थक दुसर्‍याचे समर्थक का नाहीत?. भाषा अभिव्यक्ति स्वातंत्र्याची! पण लढा मात्र रुचणार्‍या किंवा विरूद्धांना ठेचणार्‍या अभिव्यक्तिपुरताच असे का?.  महाराष्ट्रात टीकेला घाबरून जाऊन  समाज घटकाने कच खाल्ली आहे अशी नोंद आहे का तुमच्याकडे? आपापले गट सांभाळणारे भित्रट अभिव्यक्ति स्वातंत्र्य दिले तरी त्याचा काय उपयोग करून घेणार, डोंबल? त्यांना अभिव्यक्ति स्वातंत्र्य नसले तरी चालेल पण विरूद्ध गटाचे तोंड शिवलेले हवे असते.  अमेरिकेत मात्र जॉर्ज बूश यांची राजकिय विरोधकांकडून हत्या(की वध?) झाल्यानंतर काय काय घडेल ह्यावर चित्रपट येऊ शकतो. सर्वांगाने अशा काल्पनिक विषयामागील प्रेरणांचा मागोवा घेण्यासाठी केलेली चर्चा सिनेमाच्या माध्यमातून प्रदर्शीत केली जाते.  तर मग गांधीवध(गांधीहत्या म्हणा हवे तर) ह्यासारख्या सत्यघटने मागील प्रेरणा दाबून ठेवण्याचे कारण जर तुम्हाला समजले तर जरा त्या दळवींना समजावा.  गमतीची गोष्ट म्हणजे मिस्त्रीच्या मराठी(मिस्त्रीच्या भाषेत घाटी) लोकांना(आणि राजकिय नेत्यांना जसे की शिवसेनाप्रमुख, इंदिरा गांधी ई.) वाहिलेल्या शिव्यांना पदवी अभ्यासक्रमात तसेच ठेवा ह्यासाठी कळवळणारे "खरे मुंबईकर" दळवींच्या मागे झेंडे घेऊन का जात नाहीत? ठाण्याला मुंबईहून डायरेक्ट ट्रेन नाही आहे का की बसचे भाडे महाग आहे?

सोमवार, २४ जानेवारी, २०११

पुरावे सोडा

बिचारे दादोजी कोंडदेव. त्यांनी पुरावेच सोडले नाहीत हो? आता तर म्हणे रामदास स्वामी हे गुरु नसून "शिष्य" असल्याचा पुरावा मिळाला आहे त्यांना. म्हणजे पुरावा तसा तोच आहे पण आधी काही लोकांनी जो अर्थ काढला होता त्याच्या एकदम उलट अर्थ निघतोय असे तज्ञांचे मत असल्याचे वाचनात आले आहे. नाहीतर काय? अहो त्याच पुराव्यांवर निर्दोष सुटलेल्यांना जगात वरच्या कोर्टाने त्याच पुराव्यांवरून वेगळा अर्थ काढत शिक्षा दिल्याच्या घटना कदाचित ह्या लोकांनी मनात ठेवल्या असतील. असाच वादंग उठला होता त्या गॅलिलिओच्या काळात. त्याने त्याच पुराव्यांना मानून प्रमेय मात्र मांडले सत्ताधार्‍यांच्या मनाविरूद्धच. म्हणे पृथ्वी विश्वाच्या केंद्रस्थानी नाही. ह्या. असे होणारच नाही. पृथ्वी केंद्र नाही तर मग पृथ्वीवर केंद्रित सत्ता निर्माण करून जनतेवर राज्य ते कसे करायचे एवढा साधा प्रश्न ह्या मूर्ख गॉलिलिओच्या डोक्यात कसा आला नाही ? तरी त्याने नंतर आपली चूक सुधारत युद्धासाठी उपयोगी (तोफेचा अचूक मारा करण्यासाठी उपयुक्त) अशी प्रमेये शोधून काही उतारा मिळविला नाहीतर होतीच त्याची फाशी पक्की. तर सांगायचे काय की जर तुम्हाला या वर्तमानात बरे वाटत नसेल तुम्ही जग बदलण्यासाठी काही व्यक्ति, संस्था, चळवळी घडवत असाल तर मग एकच काम करा. ढिगभर पुरावे तासा तासाला सोडा की अमूक एक शिष्य. अमूक एक गुरु. अमूक एक असाच फुकटचा सोंड्या. नाहीतर काय होइल त्या सोंड्याची १५ वी पिढी असे मानेल की तोच गुरु आणि तुम्ही सोंड्या. मग? चालेल तुम्हाला? काय म्हणालात? फरक काय पडतो? अरे तुम्हाला नसेल फरक पडत (तुम्ही नसणार ना  तेव्हा). पण बिचारी मुले इतिहास म्हणून जे शिकतात त्याने डोक्याचा भूगा होतो त्याचे काय? मोठा भाऊ शिकतो एक आणि पुढल्या वर्षी धाकटा शिकतो उलटेच?  भूगोल मैलावर बदलतो हे समजते पण दैदिप्यमान असा इतिहास देखील आता मैलामैलावर बदलणार का? असे नसेल होऊ द्यायचे तर नम्र विनंति ऐका आणि तुमच्या महान कार्याचे श्रेय मिळण्यापुरते तरी पुरावे सोडाच. काय म्हणता श्रेय नव्हे कार्य महत्वाचे ? खात्रीच पटली आता. कसली काय विचारता?  तुम्ही तुमच्या महान कार्यात यशस्वी होणारच याची. शुभेच्छा.

"किसी के बाप का नही" हाजिर हो..........

म्हणजे सुजाण वाचकांना त्यात मुंबईमधे महाराष्ट्र सरकारचा पगार घेणार्‍या पोलिस अधिकार्‍याचे खडे बोल ऐकलेल्या की मुंबई किसी के बाप की नही, त्यांना असे वाटते की आता असे शूर अधिकारी खरे गरजेचे आहेत जम्मू कश्मिर मधे. २०११ चा तो दुर्दैवी प्रजासत्ताक दिन जवळ आला असे अतिरेक्यांना(परकीय) वाटते आहे. कश्मिर राज्य सरकार आणि मुख्यमंत्री यांनी तणाव कमी करण्यासाठी संवेदनशील होण्याचे ठरविले आहे. म्हणजे उर्वरित भारतीयांच्या संवेदना गेल्या काश्मिरच्या ****. पण जे स्थानिक आहेत ज्यांना स्वतःवर अन्याय होत असल्याची भावना तीव्र आहे त्यांच्या भावना खुलेआमपणे दुखवल्या जाताना  कोणत्या भारतीय राज्याचा जनतेचा प्रतिनिधी असे होऊ देइल  ? (कोणी उत्तर दिले ते महाराष्ट्र असे? आं?) तर आता काही उपटसुंभ म्हणे देशात कुठे ही राष्ट्रध्वज फडकविणॆ (१९४७ नंतर) आणि ते देखील प्रजासत्तक दिनी हे आपले कर्तव्य नव्हे तर हक्क असे मानतात. त्या शाळकरी मुलांना उन्हात उभे करता, चित्रपटाआधी राष्ट्रध्वजाला वंदन करण्याचा कायदा करता तर असे या अल्पसंख्य उपटसुंभ स्यूडो राष्ट्रप्रेमींना वाटल्यास नवल ते काय? मग? ते निघाले उत्तरेकडे ध्वजारोहणासाठी. तर त्यांची रेल्वेगाडी रात्री २ वाजता अहमदनगरजवळ इंजिन उलटे लावून परत मागे खेचून नेण्यात सरकारला कसेबसे यश आले, नशीब. खरे तर त्या लोकांनी दवंडी पिटावी. मुंबईत. अरे कुठे आहे तो ठणकावणारा वीर ?, जाईल का आता तो सर्व भारतीयांच्या वतीने श्रीनगरला ?. "काश्मिर किसी के बाप का नही" असे उर्वरीत भारतीयांचे म्हणणे तेथील नादान राज्यकर्त्यांना ऐकवेल तर लोक त्या वीराचे पाय छत्रपति शिवाजी आंतरराष्ट्रिय विमानतळापासून  धुवत त्याला डोक्यावर नाचवत वाजत गाजत फटाके उडवत सर्व आधीचा कटुपणा (मुंबई किसी के बाप की नही वगैरे) विसरून टाकतील ना?. म्हणजे आमचे जवान हौतात्म्य पत्करताना विचार करतात की आपण भारतमातेसाठी बलिदान देत आहोत. त्या पवित्र आत्म्यांना कसे काय पटेल की त्याच भूमिच्या राजधानीच्या शहरातील एका फुटकळ चौकात झेंडा लावणे राज्याच्या कायदा सुव्यवस्थेत बसत नाही आहे? तर? शोधा सर्वांनी जरा. कुठे आहेत ते माननीय पोलिस अधिकारी ? काय बरे नाव त्यांचे? आठवत देखील नाही आता.

रविवार, १८ एप्रिल, २०१०

खानला जेव्हा जाग येते.

 पाकिस्तानी चांगले आहेत यावर दुमत झाल्याने (कोण रे तो आडवा येणारा?) खान महाशय वैतागले आहेत. अरे काय म्हणायचे या मागासवर्गीय / कर्मठ / सनातनी/ पुरुषप्रधान / वर्न्याकुलर इ लोकांना ? खानाने   त्याच्या दोन नम्बरच्या  पत्निसोबत (वाचा करण जोहर) मिळून जगात चुकीच्या मार्गावर गेलेल्या  अमेरिकी प्रशासनाला  काहीतरी माणुसकी वगैरे समजावी या उद्दात्त हेतूने चित्रपट बनविला मग तर भारतात त्यास पाकिस्तानी लोकांबद्दल असलेला द्वेष मिटवता येऊ नये म्हणजे काय? त्याने आवेशात जाहिर केले की यापुढे पाकिस्तान द्वेष बंद म्हणजे साफ़ बंद. पाकिस्तानी माणसे काही अतिरेकी कारवाया करीत नाहीत असे ठणकवुन सांगताना त्यास थोड़ीही वर लिहिलेल्या मागासवर्गीय / कर्मठ / सनातनी/ पुरुषप्रधान / वर्न्याकुलर इ लेकांची भीतीवगैरे  वाटली नाही.  खान बहाद्दुर आहे असा बोलबाला मुम्बापूरीत वादू लागला, मग काय म्हणता. त्या नादान कोत्या वृत्तीच्या लोकांना म्हणे मुम्बैवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा निषेध म्हणून पाकिस्तानी क्रिडापटू,  कलाकार आणि समर्थक यांना भारताची दालने बंद करावीत असे काहीसे वाटू लागल्याने खानाचा एकंदरीतच प्लान कोलमडाया  लागला की हो. त्यावर खानाने आरोळ  ठोकली की इतरान्नी  केले तर चालते  मग मी मुसलमान असल्यानेच ही हिन्दू बहुसंख्य जमात मला विरोध करते आहे. अनेक जणांनी  खानास समजावले पण नाही. खानाने शेवटचे सांगितले की एक्वेळ मी माझे सुपरस्टार पद सोडीन पण माझा तत्वावरील विश्वास कध्धीकधी सोडणार नाही.  आपल्या चित्रपटाचा शो अरब देशात लोकप्रिय होतोय याचाही आनंद बिच्चारा खान घेऊ शकत नव्हता म्हणजे बघा किती त्रास. पण शेवटी सगळे गोड  झाले.  नादान लोकांना त्यांची चूक समजली. चित्रपट़ास विरोध करून खान बध्रणार  नाहीं किंवा तो कशालाही बधणार नाही.   त्याला एकाच गोष्टीचे वाईट वाटते ते की अमेरिकेत त्याच्या छोट्या खानान्ना  वेगळ्या लाइनीमधे उभे केले जाते. तुमचे आमचे आड़नाव साधे  जुनाट हिंदी चित्रपटातील सुपरस्टार प्रमाणे नाही याचा आनंद मनवत असाल  तर खुशाल मनवा. आम्म्ही खान नाही याचा आम्हाला फायदा होतो हे खानालाही समजले असेल एवढीच अमेरिकेच्या चरणी प्रार्थना आणि जागतिक दहशतवादाविरुद्ध (उर्फ़ जेहादविरुद्ध ) लढण्याच्या शुभेच्छा.  त्यात पाकिस्तानातील चांगल्या लोकांना मात्र इजा पोहोचू नये एवढीच आशा.   फार मोठी आशा करत नाही.    

रविवार, ३ जानेवारी, २०१०

कोणता झेंडा घेऊ

अरे  वेड्यांनो, हात किती ? २. झेंडे किती? २. मग प्रश्न का?  कोणता झेंडा घेऊ हाती का? सध्याचे राज्य असे आहे की कार्यकर्त्यास कमीत कमी २ ते ३ झेंडे निवडणूकीच्या आधी आणि एखादा अपक्ष असे चार झेंडे बाळगावे लागतात. जर शिवसेनेच्यावर प्रेम असणारा कार्यकर्ता असेल तर त्याला प्रश्न पडण्याचे कारण नाही.   मतदार खरे प्रश्नात पडतात की कोणाला मत देऊ कारण एकालाच मत द्यायचे असते ना? छगन भुजबळ ह्यांच्या जाण्याने कार्यकर्त्यात जो संताप झाला होता तेव्हा कोणालाच हा प्रश्न पडला नाही. राष्ट्रवादी जेव्हा कांग्रेस पासून वेगळी झाली  तेव्हा कांग्रेस कार्यकर्त्याचा २००० मध्ये असा संभ्रम झाला नाहीं. बरे सेना आणि मनसे ह्यानी दोन निवडणूका लढवल्या आता कोणालाच झेंडा कोणता हाती घेऊ असा संभ्रम असण्याचे कारण नाही.  सेना छटपूजा साजरी करते मनसे नाही सेना अमराठीना लोकसभेवर पाठवते मनसे अजूनपर्यंत तरी नाही.  सेना मराठी माणसाच्यासाठीच आहे असा 'नक्की' विश्वास वाटत नाही तेव्हाच मतदार मनसेकडे वळतात.  सेनेचे आक्रमक रूप भावलेले मनसेकडे वळतात. सेनेत नाराज असलेले मनसेकडे वळतात. पण तसेच  मनसेतून लोकसभेच्या निवडणूकीनंतर  श्वेता परुळकर, प्रकाश महाजन "कोणता झेंडा घेऊ हाती ?" विचारतच परत सेनेत आले ना ?  लोकांचा ह्या राजकीय सर्कशीवराचा विश्वास उडाला असून "कोणता झेंडा घेऊ?" विचारणाऱ्याची दया त्यांना येईलच असे सांगता येत नाही.  देशात एवढे राजकीय झेंडे आहेत की हात कमी पडतील ? मराठी माणसाच्या हिताचा झेंडा मतदारांनी अजूनपर्यंत हाती ठेवल्यानेच ह्यांचे गाणे एवढे त्रासदायक वाटत नाही.  एक गोष्ट कार्यकर्त्यानी  समजून घ्यावी की महाराष्ट्राच्या राजकारणात कोणताही झेंडा असू देत त्याचा उद्देश एकच असावा. महाराष्ट्रवाद. जो पर्यंत तो टिकेल तोपर्यंत मतदान "रोटी कपड़ा मकान" असल्या लेवल पर्यंत जाणार नाही. (प्रत्येक M .P. आपल्या भागासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा फायदा घेउन "बिजली सड़क पानी" देण्यास बांधील असतोच).   

शुक्रवार, २५ डिसेंबर, २००९

महाराष्ट्राचा नच बलिये

म्हणजे काय? की पंजाबात एक कार्यक्रम आहे, "पंजाब दा आपण ह्यांना पाहिलात का?" त्यात पंजाब दूरदर्शन (असे काही आहे तर)  हरविलेल्या सरदारजी आणि गैर सरदारजी लोकांची माहिती पंजाबीत प्रसारित करते. बरे दूसरा कार्यक्रम आहे पंजाब दा सुपरस्टार. हयात पंजाबी सरदारजी आणि धर्मेन्द्र (उर्फ़ धरमेंदर) प्रभावित (किंवा नात्यातील ) कलाकार (उर्फ़ फाईटमास्टर) कोळीगीतं गात नाच दाखवतात. लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ ह्यांच्याप्रमाने आम्हाला बनायचे आहे असे सांगतात. परीक्षक म्हणून डेविड़ धवन असावा बहुदा.  अरे वेड्यानो, हिंदी मनोरंजन उद्योगात भारतच नवे तर सिंगापुर इंग्लॅण्ड अमेरिका आणि स्विज़र्लंड पासून मुले शिकून येतात (अभिषेक बच्चन , कटरीना कैफ, अक्षय कुमार , फरदीन खान इ ) त्यांचे उच्चार वागणूक जराही तुमच्या आसपासच्या गल्लीतील हीरोच्या स्टाइलशी मिळतात  का? बरे ह्यांना सालसा येतो ब्रेक डांस येतो मुजरा येतो (मुलींना हो)  पायाचा डांस येतो मानेचा येतो पाठीचा येतो आणि जे हलविता येइल त्याचा येतो पण ह्यांना गोंधळ म्हणजे काय माहित नाही. मुम्बैतिल कोळी बोलतात ती भाषा म्हणजे मराठी हा ह्यांचा समज (एका चडीयाने विचारले तू कोळी भाषेत  (नको नको) का बोलतोस?)  मराठी सिनेमा  आधी आला नंतर हिंदी सिनेमाचे पिल्लू बोट धरून चालायला शिकले इ गोष्टी ह्यांना माहित नाहीत. महाराष्ट्राच्या नच बलिये (आई ग)   नावाच्या कार्यक्रमात येणारे डांसर आणि सेलेब्रिटी पहिल्या की ह्यांत महाराष्ट्राचे नेमके काय आहे असे वाटते. महाराष्ट्रांत कोणता नाच प्रसिद्ध आहे? हिंदी सिनेमाचा ? गणपति विसर्जनातिल ? दांडिया ? समुहनृत्य ? धनगरी गाजा ? दिंडी कला ? कोळी नृत्य ? लावणी ? पोवाडा ? तमाशा ?  गणेश नृत्य ? लेजीम ? वाघ्या मुरळी ? भगवान् दादा स्टाईल ? अरे अमिताभने पण ज्यांची नाचाची स्टाईल उचलली त्या भगवान दादांच्या महाराष्ट्रात आम्हाला पंजाबी आणि इतर लोकांच्या (वापरलेल्या ) नाचाच्या नकला का कराव्या लागतात?   ज्या सर्फोजी(२) महाराजांच्या तंजावर मधे भारतनाटयम जन्मले त्या महाराष्ट्राचा 'नच बलिये' आणि महाराष्ट्राचा 'सुपरस्टार'  कसा पाहिजे?  माधुरी दिक्षीत प्रमाणे. ट्रेंडसेटर. नकल्या नव्हे?